काँग्रेसकडून महिलांबरोबरच महाराष्ट्राचा विश्वासघात, तेजस्वी सूर्या यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेससह इंडी आघाडीने नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचाही विश्वासघात केला आहे, असा घणाघात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी केला. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. Tejasvi Surya

लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्ती आणि परीसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.



तेजस्वी सूर्या म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांनंतरही काँग्रेस व इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाची वाट रोखली. संसदीय इतिहासात १९९६ पासून २०२६ पर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला सदैव पाठिंबा दिला आहे. आता आगामी काळात संसदेत पुन्हा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ मांडले जाणार असून, त्या वेळी महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत कोणताही पक्ष करणार नाही.’

‘काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी असून, महिलांच्या प्रगतीत काँग्रेसने कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे तुष्टीकरण करण्यासाठी गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तिहेरी तलाकच्या अमानवी व बेकायदा प्रथेचे समर्थन केले,’ अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली.

‘परीसीमन विधेयकाद्वारे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा प्रो-रेटा बेसवर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शपने त्याला विरोध दर्शविल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असून, त्याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला अवघी एक अतिरिक्त जागा येणार आहे. मोदी सरकारच्या फॉर्म्युलानुसार, महाराष्ट्राला २४ अतिरिक्त जागा मिळतील. त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा होईल. मात्र, विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचाही विश्वासघात केला असून मतदारच विरोधकांना धडा शिकवतील,’ असा विश्वास तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला.

Congress betrayed women and maharashtra, alleges Tejasvi Surya

महत्वाच्या बातम्या