विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : High alert गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या गंभीर इशाऱ्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील, धार्मिक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पद्धतीने वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, स्पेशल सेल आणि निमलष्करी दलांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.High alert
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संबंधित मॉड्यूल दिल्लीतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे. विशेषतः गर्दीची बाजारपेठ, धार्मिक स्थळे, राजकीय पक्षांची कार्यालये, लष्करी प्रतिष्ठाने आणि पोलीस ठाणी संभाव्य लक्ष्य असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे. मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि विमानतळ परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली भाजपा प्रदेश कार्यालय आणि भाजपा राष्ट्रीय मुख्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स उभारून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.High alert
दिल्ली पोलीस स्पेशल सेलने नुकतेच पाकिस्तानी गँगस्टर-दहशतवादी शहजाद भट्टीशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तपास यंत्रणांच्या मते, शहजाद भट्टी हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या निर्देशानुसार काम करत होता. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
तपासादरम्यान या मॉड्यूलमधील सदस्य दिल्लीत ‘टार्गेट किलिंग’ म्हणजेच निवडक हत्या करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. राजधानीतील एका प्रमुख मंदिराची रेकी करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. संशयितांनी मंदिर परिसराचे व्हिडिओ तयार करून ते सीमापार असलेल्या त्यांच्या हँडलर्सना पाठवले होते. मंदिर परिसरात तैनात असलेल्या पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांवर गोळीबार करून मोठी घबराट निर्माण करण्याचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे.
याशिवाय दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एका लोकप्रिय ढाब्यावर ग्रेनेड हल्ल्याचा कटही रचण्यात आला होता. या ढाब्यावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि नागरिकांची गर्दी असते. सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार येथील लष्करी कॅम्पची रेकी करून त्याचे व्हिडिओ पाकिस्तानमधील हँडलर्सना पाठवण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील काही पोलीस ठाणीही या मॉड्यूलच्या निशाण्यावर होती.
सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही विशेष नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. संशयास्पद हालचाली, आर्थिक व्यवहार आणि सीमापार संपर्कांची चौकशी सुरू असून राष्ट्रीय तपास यंत्रणाही या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटानंतर उघडकीस आलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ‘व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल’ची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तपासादरम्यान हरियाणातील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित काही कट्टरपंथी डॉक्टर, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आला होता.
सध्याच्या अलर्टनंतर दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे सांगितले आहे. राजधानीत पुढील काही दिवस सुरक्षा व्यवस्था अधिक कडक ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
High alert in Delhi after terror attack warning
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा