सरकारच्या हातातील टूलकिट बनू नका, प्रियंका चतुर्वेदी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रशिन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. पण त्याचे निमंत्रण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकावरील अनेक विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले नव्हते. यामुळे परदेशी पाहुण्यांच्या स्वागत समारंभ व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विरोधकांना निमंत्रित करण्याची देशाची परंपरा खंडीत पडल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या प्रकरणी आपल्या पक्षाचा संताप व्यक्त केला आहे.

प्रियंका चतुर्वेदी राष्ट्रपतींना उद्देशून आपल्या पत्रात म्हणाल्या, लोकशाहीत आपली भूमिका द्विपक्षीय(सत्ताधारी व विरोधक) आहे. घटनात्मक तत्वे जपण्याची आपली जबाबदारी आहे, यात सत्ताधारी व विरोधक या लोकशाहीच्या दोन्ही अंगांचा समावेश आहे. पण सरकारने विरोधी पक्षांना दूर ठेवण्यासाठी परदेशी मान्यवरांच्या स्वागतार्थ आयोजित केलेल्या सरकारी मेजवानीचे अपहरण केले ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. हे लोकशाहीसाठी चांगले संकेत नाहीत. यातून केवळ सत्ताधारी यंत्रणेची खोटी मानसिकता दिसून येते.

राष्ट्रपती हे पद केवळ सत्ताधारी पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे व संविधानाचे सर्वोच्च प्रतीक आहे. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणारे राजकीय भोजन हे सर्वपक्षीय असते. त्यात विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रित करणे हे देशाची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मोडणे लोकशाहीला खीळ घालण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

priyanka Chaturvedi’s appeal to President Draupadi Murmu

महत्वाच्या बातम्या