विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या २९ महापालिकांतील २ हजार ८६९ जागांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुणे महापालिकेत सर्वाधिक म्हणजे १६५ जागांसाठी ३ हजार १७९ तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबईत महापालिकेच्या २२७ जागांसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. आता २ जानेवारी या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. Ichalkaranji Sees Lowest Count
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार ३० डिसेंबरला संपली. या मुदतीत २९ महापालिकांमध्ये विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत. इचलकरंजी महापालिकेत सर्वात कमी म्हणजे ६५ जागांसाठी ४५६ अर्ज आले आहेत. या ३३ हजार ६०६ अर्जाची बुधवारी छाननी करण्यात आली. छाननीत किती उमेदवारी अर्ज बाद झाले याची माहिती उशीरापर्यंत मिळू शकली नाही. तर शुक्रवारी प्रत्यक्षात किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
आज २ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीनंतर महापालिका निवडणुकीतील लढतींचे प्रभागनिहाय चित्र स्पष्ट होऊ होईल. अनेक वर्षांनंतर महापालिका निवडणूका होत असल्याने विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक अर्ज बाद होतील. तर २ तारखेला पॉलिटिकल सेटलमेंट झाल्यानंतर देखील अनेक अर्ज मागे घेण्यात येतील. त्यामुळे २ तारखेनंतर या संख्येत घट होऊ शकते.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवसाअखेर २५१६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर बुधवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर १६७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने नामांकन निकष पूर्ण न केल्यामुळे हे अर्ज फेटाळले होते. याचा अर्थ आता चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी पालिका निवडणुकीत २,२३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नामांकन नाकारल्यामुळे विविध नामांकन केंद्रांवर उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. अनेक उमेदवारांनी भाजपवर त्यांचे नामांकन नाकारल्याचा आरोप केला, परंतु निवडणूक अधिकाऱ्याऱ्यांनी कागदपत्रांच्या अभावामुळे ते फेटाळले.
महापालिकानिहाय उमेदवारी अर्ज आणि कंसात जागांची संख्या
छत्रपती संभाजीनगर: १,८७० (११५)
नवी मुंबई : ९५६ (१११)
वसई-विरार : ९३५ (११५)
कोल्हापूर: ८१३ (८१)
कल्याण-डोंबिवली : ८६० (१२२)
ठाणे: १ हजार १२८ (१३१)
उल्हासनगर : ७०६ (७८)
नाशिक : २ हजार ५३६ (१२२)
पिपरी – चिंचवड : १ हजार ९९३ (१२८)
सोलापूरः १ हजार ४६० (१०२)
अकोला: ७७७ (८०)
अमरावतीः १०२७ (८७)
नागपूर : १ हजार ४५२ (१५१)
चंद्रपूरः ६०६ (६६)
लातूर : ७५९ (७०)
परभणी : ९१९ (६५)
भिवंडी-निजामपूर : १ हजार ३३ (९०)
मालेगावः ७१० (८४०)
पनवेलः ३९१ (७८)
मिरा-भाईंदरः ६३२ (९५)
नांदेड-वाघाळा : १ हजार २०३ (८१)
सांगली-मिरज-कुपवाड: १ हजार ६२ (७८)
जळगावः १,०३८ (७५)
धुळे : ७२१ (७४)
अहिल्यानगर : ७८८ (६८)
जालना : १ हजार २६० (६५)