विशेष प्रतिनिधी
मुंबई : तपोवन परिसर साधुग्रामच्या नावाखाली पूर्णपणे रिकामा करून, ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये बदलून त्याला निवासी विकास क्षेत्रात रूपांतरित करण्याचा डाव आहे. टीडीआरचा वापर अधिकाधिक करून बिल्डर्सना लाखो-कोटींचा फायदा मिळावा, हा सर्व खेळ साधुग्रामच्या नावाखाली सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. Aditya Thackeray
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या सर्वांगीण तयारीला वेग आला असून, शहराचे रूपडे बदलण्याच्या अनेक योजना गतीमान करण्यात आल्या आहेत. मात्र, तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याच्या प्रस्तावामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या वस्तीकरिता 1150 एकरांवर साधूग्राम विकसित करण्याचा आराखडा आखण्यात आला आहे. या कामासाठी जवळपास 1800 झाडे तोडावी लागणार असल्याचे स्पष्ट होताच विविध पक्ष, पर्यावरणप्रेमी, कलाकार आणि स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला आहे. तपोवन, नैसर्गिक वारसा असलेले आणि नाशिककरांसाठी आध्यात्मिक व पर्यावरणीय महत्त्वाचे क्षेत्र असल्यामुळे येथील परिसंस्थेला मोठा धोका निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमधील एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओचा दाखला देत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या बिल्डरच्या बाजूलाच बसले होते नाशिक भाजपचे खजिनदार, ही बाब त्यांनी मुद्दाम अधोरेखित केली. त्यामुळे हा खरा साधूग्राम की TDR मार्फत संपत्ती खेळ? असा त्यांनी उघड सवाल केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिकवर प्रचंड प्रेम असल्याचे जे सांगतात तेच आज नाशिकचा हिरवा श्वास कापू पाहत आहेत. तपोवनला कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी स्थानिक नागरिक स्वच्छता मोहिमा राबवत आहेत, पण त्याच तपोवनला भाजप पूर्णपणे साफ करायला निघाले आहेत. भाजपकडून धर्माचा मुखवटा लावून साधूग्राम उभारण्याची गोष्ट सांगत असले तरी, वास्तवात हा खजिना आणि TDR चा व्यवहार असल्याचा त्यांचा टोला होता. त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांनंतर सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा सुरू झाली आहे. बिल्डर कोण? त्याच्या मागचे हितसंबंध कोणाचे? कुंभमेला हा करोडो भक्तांचा महाधर्म सोहळा असला तरी त्याच्या नावाखाली जंगलतोड करणे लोकांना मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारो नैसर्गिक झाडे उद्ध्वस्त करणे चुकीचे
दरम्यान, या विषयावर केवळ शिवसेना ठाकरे गटच नव्हे तर मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे गटातील काही स्थानिक घटक, पर्यावरणवादी तसेच अनेक सेलिब्रिटींनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत-महंतांची सुविधा आणि व्यवस्थेला कोणी विरोध करीत नाही, मात्र त्यासाठी हजारो नैसर्गिक झाडे उद्ध्वस्त करणे चुकीचे असल्याचे मत वेगवेगळ्या स्तरातून व्यक्त होत आहे. आधीच हवामान बदल आणि प्रदूषणाच्या संकटाने ग्रासलेल्या शहरात झाडांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे, असा सूर सर्वत्र उमटत आहे. अनेकांनी असा दावा केला की, साधूग्रामसाठी पर्यायी जागा शोधता आली असती; मग तपोवनच लक्ष्य का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
झाडतोड थांबणार की विकासाच्या नावाखाली हिरवळ संपणार?
आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला, साधूग्राम आम्हाला नको, असे आम्ही कधीच म्हटले नाही. धार्मिक व्यवस्थेला संपूर्ण मान्यता आहे. पण नाशिक महानगरपालिका जर भाजपच्या हातात गेली तर संपूर्ण नाशिक विक्रीला काढण्यात येईल, हे निश्चित! आम्हाला साधूग्रामही हवा, तपोवनही हवं, पण भाजपच्या बिल्डर-राजवटीची दादागिरी नको. तर दुसरीकडे नागरिक आणि पर्यावरणप्रेमी पक्षही तपोवन वाचवा अशी मागणी जोरात करत आहेत. त्यामुळे पुढील काळात तपोवनातील झाडतोड थांबणार की विकासाच्या नावाखाली हिरवळ संपणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Aditya Thackeray Alleges Massive Builder Windfall in the Name of ‘Sadhugram’
महत्वाच्या बातम्या