अजितदादांनी राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर केले 82 हजारांचे कर्ज, सतेज पाटील यांची टीका

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक घरातून बाहेर पडताना विचार करतो की अजितदादांनी आपल्या डोक्यावर किती कर्ज वाढवले. राज्यातील प्रत्येक घरातील माणसाच्या डोक्यावर 82 हजारांचे कर्ज आहे, अशी टीका काँग्रेस आमदार सतेज पाटील सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना विधान परिषदेत केली. Satej Patil

महायुती सरकारच्या पहिल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्य अधोगतीला गेले आहे. महाराष्ट्राचा विकासदर घटला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 82 हजार रुपयांचे कर्ज असून गेल्या आठ महिन्यात अर्थसंकल्पातील फक्त 42 टक्के निधी खर्च झाला. त्यानंतरही सरकारने 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यातील किती पैसे पुढील तीन महिन्यात खर्च होतील, असा सवाल पाटील यांनी केला.

गुन्हेगारी आणि शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत पोहोचली याची कोणतीच आकडेवारी सरकारने दिली नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरविकास खात्याला मात्र 9 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप करत सतेज पाटील म्हणाले, 18 टक्क्यांवर कर्जाचा आकडा पोहोचला आहे. हे आकडे पाहिल्यानंतर लक्षात येते की नियोजन चुकलेली आहे. अर्थसंकल्प करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक होते.

पुरवणी मागण्या या आकस्मिक आलेल्या खर्चासाठी करायच्या असतात. मात्र 11 विभागांनी पुरवणी मागण्यांवर सर्जिकल स्ट्राईक केलेले दिसत आहे. या विभागांना एकूण पुरवणी मागण्यांच्या 85 टक्के निधी देण्यात आलेले आहे. या 11 विभागांच्या सुरु असलेल्या योजनांना मार्चच्या बजेटमध्ये तरतूद का करण्यात आली नाही? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले की, जवळजवळ 87 टक्के रक्कम फक्त 11 विभागांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुळ अर्थसंकल्प फक्त दस्ताऐवज होता का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. महायुती सरकार आणि अर्थमंत्री नियोजनामध्ये कुठे तरी चुकले आहेत. निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने बजेटमध्ये कुठेही आलेले नाही. मार्चमध्येच लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी तरतूद करण्यात आली पाहिजे होती. तो मुद्दा पुरवणी मागण्यांमध्ये कसा काय येतो?

Ajitdada imposed a loan of Rs 82 thousand on the head of every person in the state, criticized by Satej Patil

महत्वाच्या बातम्या