भाजपला सोडचिठ्ठी देत अमोल बालवडकर राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी जाहीर

विशेष प्रतिनिधी

पुणे : आता अमोल बालवडकर भाजपला दाखवून देईल की खरा कार्यकर्ता कोण असतो. या निवडणुकीत भाजपाला ‘धोबीपछाड’ देणार आहोत. ही लढाई वचपा काढण्यासाठी नाही, तर जनतेला सत्य दाखवण्यासाठी आहे, असा इशारा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे. Amol Balwadkar

बाणेर बालेवाडी प्रभागातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपला सोडचिठ्ठी देत अमोल बालवडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आक्रमक भूमिका घेत भाजपवर थेट टीका केली. “माझ्या आयुष्यातील कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.



भाजपमध्ये कार्यरत असताना अनेक अडचणी आणि मर्यादांना सामोरे जावे लागल्याचा आरोप करत त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. “कोणताही पक्ष मोठा व्हावा, पण त्याने पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नाही.

अमोल बालवडकर यांचा स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि आक्रमक शैली लक्षात घेता, राष्ट्रवादीला याचा थेट फायदा होईल, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, अमोल बालवडकर यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याने त्या पक्षातील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तिकीट वाटप, डावलले जाणे आणि स्थानिक नेतृत्वाशी मतभेद या कारणांमुळे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी अमोल बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्या काळात त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दाला मान देत अमोल बालवडकर यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पक्षशिस्त पाळत त्यांनी माघार घेतली असली, तरी त्यानंतरही भाजपमध्ये आपल्याला अपेक्षित संधी आणि सन्मान मिळाला नाही, अशी खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, नव्या पक्षातून आक्रमक भूमिका घेतली आहे.

Amol Balwadkar quits BJP and joins NCP; announces candidacy under Ajit Pawar’s leadership

महत्वाच्या बातम्या