जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून महायुतीची सत्ता निश्चित होत असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. निकालांचे कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने असून ग्रामीण महाराष्ट्राने सरकारच्या कामकाजावर विश्वास दाखवला असल्याचे त्यांनी म्हटले. Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजप नंबर वन पक्ष ठरला आहे आणि या सर्व ठिकाणी महायुतीचीच सत्ता स्थापन होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या सात जिल्हा परिषदांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना रत्नागिरी आणि रायगडमध्ये नंबर एकवर असून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा परिषदेत आघाडीवर आहे. कोल्हापूर आणि लातूरमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढले असून तेथेही महायुतीच नंबर एकवर असल्याचे त्यांनी सांगितले.

२०१७ च्या निवडणुकांमध्ये भाजपला जिल्हा परिषदांमध्ये १४१ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजपने २३६ जागांवर विजय मिळवून २०१७ चा विक्रम मोडला आहे. यामुळे भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा ठामपणे स्थापित झाला आहे.

पंचायत समित्यांच्या बाबतीतही भाजपने मोठी झेप घेतली आहे. २०१७ मध्ये भाजपकडे २८४ पंचायत समिती जागा होत्या, तर यावेळी आतापर्यंतच्या कलानुसार ४१० जागा भाजपला मिळाल्या आहेत. एकूण १२५ पंचायत समित्यांपैकी साधारणतः ५० समित्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, २६ शिवसेनेकडे, २३ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, सात ते आठ काँग्रेसकडे, सात ते आठ शरद पवार गटाकडे आणि पाच उबाठा गटाकडे असतील, असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



महायुतीने एकूण १२५ पैकी १०० पेक्षा अधिक पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवला असून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आपण प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता, असेही त्यांनी सांगितले. केवळ एक आवाहनात्मक व्हिडिओ केला होता, मात्र तरीही जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखवला, असे ते म्हणाले.

या निकालातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता स्पष्टपणे समोर आली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांतून राज्य सरकारने केलेल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या विजयाबद्दल त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले आणि सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचे नमूद केले.

महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. सकाळी नऊ वाजता प्रवक्ते वक्तव्य करतात, मात्र त्याला काहीही अर्थ नसतो. उलट त्याचा फायदा आम्हालाच होतो, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

BJP Emerges as Largest Party in Zilla Parishad and Panchayat Samiti Polls, ; Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या