Maharashtra राज्यात ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकतीच नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. Maharashtra

राज्यभरातील एकूण ३१ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, त्यापैकी १७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी आजपर्यंत झालेल्या नुकसानीची आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.



शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. पिकांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि घरांचे नुकसान झालेल्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८,५०० रुपये मदत तर बागायती पिकांसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये दिले जातील. जमिनीचे नुकसान झाल्यास खरडून गेलेल्या शेतासाठी प्रति हेक्टर १८,००० ते ४७,००० रुपये या दरम्यान मदत मिळणार असून त्यावर दोन हेक्टरची मर्यादा असेल. रेशीम उत्पादनाचे नुकसान झालेल्यांनाही आधार देण्यात आला आहे. एरी, मलबेरी आणि टसर यासाठी ६,००० रुपये तर मुगा रेशीमसाठी ७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.

जनावरांचे नुकसान झाल्यास देखील आर्थिक भरपाई जाहीर करण्यात आली आहे. दुधाळ जनावर दगावल्यास ३७,५०० रुपये, ओढ कामाचे जनावर मृत झाल्यास ३२,००० रुपये तर लहान जनावर दगावल्यास २०,००० रुपये दिले जातील. शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर यासाठी प्रत्येकी ४,००० रुपये मिळतील. मोठ्या जनावरांसाठी मदतीची मर्यादा तीन तर छोट्या जनावरांसाठी तीस एवढी ठेवण्यात आली आहे. कुक्कुटपालकांनाही मदत मिळणार असून प्रत्येक कोंबडीसाठी १०० रुपये मिळतील आणि एका कुटुंबाला कमाल १०,००० रुपयांची मदत दिली जाईल.

नुकसानीत घरांचाही विचार करण्यात आला आहे. झोपडीसाठी ८,००० रुपये तर पक्क्या घराच्या नुकसानीसाठी थेट १ लाख २० हजार रुपये दिले जाणार आहेत. या सर्व योजनांमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Crops damaged in 37 lakh 91 thousand 321 hectares of area Maharashtra

महत्वाच्या बातम्या