विशेष प्रतिनिधी
मुंबई : farmers गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना देखील यामुळे बऱ्यापैकी नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच अनेक नेत्यांनी सरकारला ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
यासंदर्भात राज्य सरकारने झालेल्या नुकसानीची पाहणी करून निर्णय घेण्याचे कबूल केले होते. आता अखेर या नुकसानीच्या पाहणीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई जाहीर केली आहे. खरीप २०२५ मधील पिकांच्या नुकसानीसाठी एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. farmers
मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून, ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे, गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते. सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार, एकूण ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने आता तातडीने पाऊलं उचलली आहेत.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जाहीर झालेली मदत आजच वितरित केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होईल. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. farmers
दरम्यान, जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ७२१ कोटी, तर नाशिकमध्ये १३.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी १४.२९, नागपूर विभागाला २३.८५ कोटी आणि अमरावती विभागाला ५६५.६० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला १०.५३ कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत एकूण २,२०० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले आहे. farmers