एका दिवसाचे सांगून येता आणि मग बाहेर पडत नाही, मराठा आंदोलनाची आठवण करून देत उच्च न्यायालयाने धनगर आंदोलकांना सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आझाद मैदानात धनगर आरक्षणासाठी परवानगी मागत दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या वर्षी मराठा आंदोलकांनी केलेल्या नाट्याची आठवण करून देत याचिकाकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. Dhangar Protesters

तुम्ही आझाद मैदानात एका दिवसाच्या आंदोलनासाठी येता, मग बाहेर पडायचं नाव घेत नाही आणि परिसराची अशी अवस्था करून ठेवता की मग साफसफाई करण्याकरिता महापालिकेच्या नाकीनऊ येतात. गेल्या वर्षी झालेल्या मराठा आंदोलनामुळे आझाद मैदान परिसराची काय अवस्था झाली होती? हे सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे आता परवानगी देताना आम्हालाही विचार करावा लागेल, या शब्दांत हायकोर्टानं आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मागायला आलेल्या धनगर आंदोलकांची चांगलीच कानउघाडणी केली. मराठा आंदोलनाला पोलिसांनी नियमाप्रमाणे एका दिवसाची परवानगी दिला होती. न्यायालयानंही तशी स्पष्ट ताकीद दिली होती. मात्र तरीही ते आंदोलन सलग पाच दिवस सुरू होतं. आंदोलक आले आणि मुंबईची दुरवस्था करून आपल्या गावी निघून गेले, असे खडे बोल यावेळी मुंबई उच्च न्यायालयानं सुनावले.



आझाद मैदानावर धनगर समाजाच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्याविरोधात जालना येथील धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती आज सकाळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली. मात्र तुम्हाला काही ठराविक दिवशीच आंदोलन का करायचं असतं?, वर्षात 365 दिवस असतात इतर कोणत्याही दिवशी हे आंदोलन का करत नाही?, असा सवाल करत तातडीच्या सुनावणीची विनंती अमान्य करत हायकोर्टानं सुनावणी 28 जानेवारीपर्यंत तहकूब केलीय.

जालना येथील धनकर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी ॲड. असिम सरोदे यांच्यामार्फत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानात त्यांना 21 जानेवारी रोजी एकदिवसीय आंदोलन करायचंय. यासाठी 5 हजार आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येतील, त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करीत पोलिसांकडे 28 नोव्हेंबर 2025 रोजी परवानगी मागण्यात आली होती. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत करणार आहोत, तसेच त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता आझाद मैदान मोकळं करू, अशी हमीही देण्यात आलीय. मात्र तरीही मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकरल्यानं आंदोलनाला परवानगी मागत याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

High Court Raps Dhangar Protesters, Recalls Maratha Agitation

महत्वाच्या बातम्या