ऑनलाईन गेमिंगच्या आडून वाढतोय धोका? लहान मुलांचा ‘ब्रेन वॉश’ करण्याचे प्रयत्न उघड

निरंजन शेरकर

पुणे : मागील काही वर्षांत लहान मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेझ प्रचंड वाढलेली पाहायला मिळत आहे. मोबाईल, टॅब आणि संगणकाच्या माध्यमातून तासन्‌तास खेळले जाणारे हे गेम्स केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून काही दहशतवादी प्रवृत्तीचे घटक लहान मुलांपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. online gaming

सायबर तज्ञ निरंजन भूसनाळे यांनी सांगितले की,” लोकप्रिय मल्टिप्लेअर गेम्समध्ये ‘चॅट’ आणि ‘व्हॉइस कम्युनिकेशन’ची सुविधा असल्याने अनोळखी व्यक्तींशी सहज संवाद साधला जातो. सुरुवातीला मैत्री, गेममधील मदत, मोफत ‘रिवॉर्ड्स’ किंवा पॉइंट्स देण्याचे आमिष दाखवून मुलांचा विश्वास जिंकला जातो. त्यानंतर हळूहळू विशिष्ट विचारसरणी, द्वेषपूर्ण मजकूर किंवा भडक व्हिडिओंची लिंक शेअर करून मुलांचा ‘ब्रेन वॉश’ करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेषतः १० ते १६ वयोगटातील मुले यासाठी अधिक संवेदनशील ठरत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. या वयात साहस, गुप्तता आणि ‘हिरो’ बनण्याची भावना तीव्र असते. काही अतिरेकी संघटना याच मानसिकतेचा गैरफायदा घेत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये गेमिंग प्लॅटफॉर्मवरूनच मुलांना खासगी ग्रुपमध्ये जोडले जाते. तिथे देशविरोधी, हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे संदेश दिले जातात. काही वेळा आर्थिक व्यवहार किंवा गुप्त माहिती देण्यासही प्रवृत्त केले जाते. मात्र, यासंदर्भात अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांचे मत असे की, सर्व ऑनलाईन गेम्स धोकादायक नसतात. मात्र, पालकांनी मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलं कोणते गेम खेळतात, कोणाशी संवाद साधतात, किती वेळ खेळतात याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये ‘पॅरेंटल कंट्रोल’ सुविधा वापरणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याबाबत मुलांना समज देणे, तसेच संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. डिजिटल युगात ऑनलाईन गेमिंग पूर्णपणे थांबवणे शक्य नसले, तरी त्याचे संभाव्य धोके ओळखून सजग राहणे ही काळाची गरज बनली आहे.

दरम्यान, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रयत्न केल्यासच मुलांना अशा प्रवृत्तींपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. ऑनलाईन गेमिंगचा आनंद घेताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणे, हेच सध्या सर्वांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.

Is the threat growing under the guise of online gaming? Attempts to ‘brainwash’ children exposed

महत्वाच्या बातम्या