दहा दिवस आधीच माेटेगावकरकडे नीट परीक्षेचे प्रश्न, सीबीआयचा न्यायालयात दावा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लातूर येथील कोचिंग क्लासेसचे मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्याकडे नीटी परीक्षेच्यर केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अगाेदर दहा दिवस हाेती. ती मिळवण्यासाठी माेटेगावकर यांनी ५ लाख रुपये दिल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय) न्यायालयात दिली.

सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर यांनी सहआरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका मिळवली. पी. व्ही. कुलकर्णी हे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या त्या पॅनलवर होते, ज्या पॅनलने नीटचा पेपर सेट केला होता. मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्याच केमिस्ट्री ट्युटोरियल्स या कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. याच वर्गात हे प्रश्न पुरवण्यात आले होते.



सीबीआयने स्पष्ट केले की, लीक झालेले प्रश्न मिळवण्यासाठी मोटेगावकर यांनी ५ लाख रुपये दिले होते. हे पैसे सीबीआयने आणखी एक आरोपी मनोज भगवानराव शिरुरे याच्या सांगण्यावरून जप्त केले आहेत. तपासादरम्यान सीबीआयने मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त केला होता, ज्याच्या फॉरेन्सिक तपासणीतून गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले. आरोपीच्या मोबाईलमध्ये एकूण ३६ फोटो सापडले. या फोटोंमध्ये १३२ केमिस्ट्रीचे प्रश्न होते जे हाताने लिहिले होते. जेव्हा सीबीआयने या प्रश्नांची तपासणी केली, तेव्हा त्यातील १११ प्रश्न एनटीएच्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळले.

मोबाईलच्या मेटाडेटा तपासातून समोर आले की, ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेच्या १० दिवस आधीच हे फोटो काढण्यात आले होते. हे सर्व प्रश्न खुद्द मोटेगावकर यांनीच लिहून घेतले.

नीट पेपर लीकच्या या मोठ्या रॅकेटमध्ये सीबीआयने आतापर्यंत पुणे, लातूर आणि इतर भागांतून १३ जणांना अटक केली असून, हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत पेपर लीक झाल्याचे आरोप झाले होते. वाढत्या वादामुळे अखेर १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती.

NEET paper reached Motegaonkar 10 days before exam, CBI tells court

महत्वाच्या बातम्या