विशेष प्रतिनिधी
पुणे : Zilla Parishad elections घराणेशाहीवर कितीही टीका हाेत असली तरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये (Zilla Parishad elections) दिग्गज नेत्यांच्या वारसांनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मुले, सुना किंवा पुतणे निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनी घवघवीत यश मिळविले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिसून आला आहे.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी मतदारसंघात माजी आमदार पाेपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनी विजय मिळविला. विशेष म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने तिकिट नाकारले हाेते. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी विजय मिळविला. शिरूर तालुक्यात माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती यांना मात्र विजय मिळविता आला नाही. भाजपकडून लढत असलेल्या मालती पाचर्णे यांचा केवळ ५१ मतांनी पराभव झाला.
पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदरमधील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादीचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक घट्ट झाली आहे. शिरूरचेच माजी आमदार अशाेक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी मात्र विजय खेचून आणला. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून त्यांनी मांडवगण फराटा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. दाैंड तालुक्यात बाेरी पार्धी मतदारसंघात माजी आमदार रमेश थाेरात यांचे पुत्र तुषार थाेरात यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीकडून लढताना विजय मिळवित तुषार प्रथमच जिल्हा परिषदेत जात आहेत. भाेर तालुक्यात कामथडी मतदारसंघात माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे पुत्र विक्रम खुटवड निवडून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात हाय-व्होल्टेज ठरलेल्या लढतींमध्ये सावंतांच्या पुतण्याने विक्रमी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी एन्ट्री केली आहे. त्यांनी विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन यांचा पराभव केला. जीवन जानकर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लढत हाेते.
कोकणातील राजकीय बालेकिल्ल्यांमध्येही नेत्यांच्या मुलांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी असगोली गटातून पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व राखत विजय संपादन केला.रायगडमध्ये आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.
परभणीकरांनी घराणेशाहीला घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबातील 5 पैकी चौघांचा पराभव झाला आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबातून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी केवळ एका जागी विजय मिळवण्यात वरपुडकरांना यश आले आहे. तर मुलगा, मुलगी, सून आणि एका पुतण्याला या निवडणुकीत पराभवाला समोर जावे लागले आहे.
Nepotism is the key in the Zilla Parishad elections!
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,