विशेष प्रतिनिधी
पुणे : देशातील पहिल्या दहा प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश होत असल्याने महापौर पदाची जबाबदारी मोठी असल्याची जाणीव असल्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपूरे यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या विशेष सभेत अभिनंदनाला उत्तर देताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पुणेकरांना अपेक्षित असलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले. Manjusha Nagpure
महापौर नागपूरे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण करून ही जबाबदारी स्वीकारल्याचे नमूद केले. तसेच पुण्याच्या राजकारणातील मार्गदर्शक आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचा उल्लेख करत त्यांनी सार्वजनिक जीवनात जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू असताना ही जबाबदारी मिळाल्याने समाजाप्रती असलेले दायित्व प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही त्यांनी पुणेकरांना दिली. संघाच्या शताब्दी निमित्ताने मांडण्यात आलेल्या पंच परिवर्तनातील पर्यावरण आणि नागरिकत्व या दोन मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी पाणी संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्ती ही उद्दिष्टे पुण्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
पुण्याचे सांस्कृतिक आणि सुंदर शहर म्हणून असलेले लौकिक टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या विकासाला मोठी गती मिळाल्याचे सांगत, पुणेकरांना अपेक्षित असलेले मोठे प्रकल्प यापुढेही यशस्वीपणे पूर्ण होत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर पदाची जबाबदारी केवळ आपली किंवा एका पक्षाची नसून, पुण्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य सुविधा, पर्यावरण रक्षण आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे नागपूरे यांनी सांगितले. नगरसेवक पुन्हा आल्यानंतर शहराच्या कारभारात गुणात्मक फरक पडतो, हे पुणेकरांना दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाच्या हातात हात घालून आणि पुणेकरांना विश्वासात घेऊन सर्वांनी मिळून शहराचा कारभार चालवूया, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा शेवट ‘जय हिंद’ या घोषणेने केला.
New Pune Mayor Manjusha Nagpure Vows Development With Strong Focus on Environment
महत्वाच्या बातम्या