सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून भिवंडीचा महापौर व उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. Harshwardhan Sapkal

टिळक भवन येथे खा. सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपाचा त्याग करुन सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. आज त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपाचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला व काँग्रेस प्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील २४ दिवसात इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली, आता कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) १२ व भाजप सोडून आलेले नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल.



भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) खासदार बाळ्यामामा म्हात्रे यावेळी म्हणाले की, भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सेक्युलर फ्रटंची स्थापन करून सत्ता स्थापन्याचा प्रयत्न मागील २४ दिवसापासून सुरु होता. समाजवादी पक्षाशी चर्चा केली पण त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थानपनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे खासदार बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..

रयतेचे राजे, मराठी मनाचा मानबिंदू आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे पक्ष कार्यालय टिळक भवन येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्य़ात आले.

No Compromise on Ideology for Power; Secular Front Formed in Bhiwandi to Keep BJP Out ; Harshwardhan Sapkal

महत्वाच्या बातम्या