शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष, रवींद्र चव्हाण यांनी फोडले शिंदेंचे तीन मोहरे

 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेकडून भाजप आणि रविंद्र चव्हाणांचा निषेध करून टीका केल्यानंतर भाजपचे पदाधिकारीही आक्रमक झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेला चोख उत्तर दिले आहे. तुम्ही आमचा एक घेणार तर आम्ही तुमचे चार घेणार! ईट का जबाब पत्थर से देंगे! या शब्दांत भाजपने उत्तर दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी टोकाला गेल्याचे दिसत आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षामध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. अगदी पक्षनेतृत्वापर्यंत याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत धाव घेतली होती. त्यानंतरही शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे कार्यक्रम सुरू असल्यामुळे बुधवारी शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शहरप्रमुख राजेश कदम यांनी थेट पत्रकार परिषद घेत रविंद्र चव्हाण यांचा निषेध केला.


पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट


कल्याण डोंबिवली हा रविंद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. शिवाय रविंद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्यावर आहे. या पार्श्वभूमिवर अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरातील शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी थेट दिल्लीत अमित शहा यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश सुरूच ठेवल्याने शिवसेनेत त्यांच्याविरोधात संताप आहे.

बुधवारीकल्याण ग्रामीणचे उपतालुकाप्रमुख विकास देसले यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले. विशेष म्हणजे विकास देसले हे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. यावरून संतप्त झालेले आमदार मोरे आणि शहरप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या धोरणावर टिका केली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विशेष केला. तसेच त्यांना महायुती धर्माची आठवण करून दिली.

मात्र, शिवसेनेच्या टिकेनंतर काही वेळात शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन रविंद्र चव्हाण यांनी थेट सिक्सर मारला. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे.
रविंद्र चव्हाण इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जातात, त्यांना प्रलोभने दाखवतात, महामंडळ देऊ, तुमच्या निवडणुकीचा खर्च देऊ, विशेष पॅकेज देऊ असे सांगतात. हे आरोप फक्त डोंबिवलीत नाही तर मालवणमध्येही झाले आहेत, असे राजेश कदम म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीत रविंद्र चव्हाण कुठल्या दिशेला चालले आहेत, असा सवालही त्यांनी केला.

Shiv Sena–BJP Clash Again as Ravindra Chavan Breaks Shinde’s Three Key Men

महत्वाच्या बातम्या