गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांकडून आठ सदस्यीय एसआयटी , पंकजा मुंडे यांच्या पीएवर आरोप

मुंबई: मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामागील संभाव्य छळ, हिंसा आणि मानसिक अत्याचार उघड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आठ सदस्यीय विशेष तपास पथक, म्हणजेच एसआयटी स्थापन केली आहे.

या एसआयटीचे नेतृत्व डीसीपी (झोन 4) रागसूधा आर. यांच्याकडे देण्यात आले असून, फॉरेन्सिक तज्ज्ञ, डिजिटल विश्लेषक आणि गुन्हे शाखेतील अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डॉ. गौरी यांचा मृतदेह वरळी येथील निवासस्थानी 24 नोव्हेंबरला आढळला. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीच त्यांच्या पती अनंत गर्जेला ताब्यात घेतले. दोन वेळा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी 2 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पोस्टमॉर्टेममध्ये गंभीर निष्कर्ष आढळले आहेत. गौरीच्या शरीरावर एकाहून अधिक जखमा, मानेला दबावाचे मार्क दिसून आले. यामुळे आत्महत्येऐवजी घातपाताची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पोलिस तपासात गर्जेच्या शरीरावरही जखमा आढळल्या. त्यांनी या जखमा फ्लॅटमध्ये खिडकीतून आत चढताना लागल्याचा दावा केला, परंतु तपास अधिकारी या जखमांचा संबंध भांडण किंवा हल्ल्याशी सू शकतो का याची चौकशी करत आहेत.



गर्जे यांच्या मोबाईलमध्ये पती-पत्नीतील वादांचे रेकॉर्डिंग्स मिळाले आहेत. एसआयटीच्या मते हे रेकॉर्डिंग्स अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात आणि तपासाची दिशा बदलू शकतात.

गौरीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्व काही दिवस ती मानसिक तणावात होती. तिला गर्जे यांच्या पूर्वसंबंधातील महिलेच्या गर्भधारणेची कागदपत्रे सापडली होती आणि तिने ती वडिलांना दाखवली होती. यामुळे तिच्यावर मानसिक छळ झाला होता का, यावर esaayti विशेष तपास करत आहे.

गौरीच्या कुटुंबाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जे यांच्यासोबतच त्यांची बहीण शीतल आणि भाऊ अजय यांना सहआरोपी केले आहे. हे दोघे सध्या फरार असून, BNS कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप दाखल आहेत.

SIT to investigate Gauri Garje death

महत्वाच्या बातम्या