विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवनेरी किल्ल्यावरील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारा यांनी शिवजयंती निमित्ताने पहिले शासकीय भाषण झाले. यावेळी अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या.
या भाषणातून सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, दादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्लयाचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. Sunetra Pawar
मागील अर्थसंकल्पात देखील आग्रा, संगमेश्वर, रायगड, वढू बुद्रुक या ठिकाणी कामे सुरू केली होती. या प्रत्येक ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असेल, अशी भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे. हे भाषण करत असताना आणि अजित पवारांविषयी बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला होता. त्यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचे बळ आम्हा सर्वांना दे, असे साकडे मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचे भाग्य मला लाभले होते. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली.
आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे. ज्या विचारांवर आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते, असे यावेळी त्यांनी म्हटले.
Sunetra Pawar Turns Emotional Remembering Ajit Dada in Her First Speech at Shivneri Fort
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती