विशेष प्रतिनिधी
हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये दिसतील, असे भाकित बहुतेक माध्यमांनी वर्तविले. काँग्रेसच्या पराभवातून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांना “बूस्टर डोस” मिळाला. त्यामुळे हे दोन्हीही नेते महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या वाटाघाटींच्या टेबलवर काँग्रेसला मागे रेटतील. काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या अटी शर्तींवर हवे तसे वाकवतील, असेही अनेकांनी म्हटले आहे. कुठल्याही निवडणुकीचा मानसिक परिणाम हा नजीकच्या निवडणुकीवर होतच असतो, तसा हरियाणाच्या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्याही निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारायचे काहीच कारण नाही. पण याचा अर्थ तो परिणाम 100 % महाविकास आघाडीवर होईल आणि काँग्रेस पूर्णपणे बॅकफूटवर जाईल किंवा ठाकरे आणि पवार काँग्रेसला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलू शकतील, असे मानणे मात्र वस्तुस्थितीला धरून होणार नाही. किंबहुना ते चूक ठरेल. Thackeray and Pawar
याचे सगळ्यांत महत्त्वाचे कारण प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या कारणांसाठी पूर्ण वेगळी असते. पण हे झाले ढोबळ कारण. त्या पलीकडे जाऊन प्रत्येक निवडणुकीच्या “मायक्रो” आणि “मॅक्रो” निकषांमध्ये मूलभूत फरक असतात, तसेच फरक हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत आहेत. मूळात हरियाणाच्या निवडणुकीत 90 विधानसभा मतदारसंघ होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्याच्या तिपटी पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 288 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूणच निवडणुकीचा स्केलच खूप मोठा आहे. त्यामुळे त्यातले राजकीय आणि सामाजिक ताणेबाणे निश्चितच भिन्न आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतली हरियाणातील परिमाणे आणि महाराष्ट्रातील परिमाणे यात मोठे अंतर आहे.
रतन टाटा गेल्यानंतर वारसा कोण सांभाळणार?, एन. चंद्रशेखरन यांच्यासह सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव पुढे
फक्त काँग्रेसच्याच बाबतीत बोलायचे झाले, तर हरियाणात काँग्रेसने 10 पैकी 5 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांची भाजपची बरोबरी साधली गेली होती. त्या उलट महाराष्ट्रात काँग्रेसने बाकी सगळ्या पक्षांवर मात करून 14 म्हणजे डबल डिजिट जागा जिंकल्या आणि बाकी सगळ्या पक्षांना सिंगल डिजिट जागांवर समाधान मानावे लागले. अगदी भाजपला देखील 23 वरून 9 जागांवर खाली यावे लागले. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या चारही पक्षांना लोकसभा निवडणुकीत सिंगल डिजिट जागा मिळाल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती, ती संख्या बदलून 2024 च्या निवडणुकीत तब्बल 14 जागांमध्ये कन्वर्ट झाली.
याचा सरळ अर्थ असा की महाराष्ट्रात बाकी कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा काँग्रेसचा राजकीय पाया अधिक विस्तृत आणि खोल आहे. शिवाय काँग्रेसचा “कमिटेड” मतदार भाजप वगळता इतर सर्व पक्षांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. काँग्रेस इतर सर्व पक्षांपेक्षा महाराष्ट्रात अधिक रुजलेला पक्ष आहे. 2014 आणि 2019 या निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेसला क्वचितच लोकसभा निवडणुकीत सिंगल डिजिट जागा मिळाल्यात, त्या उलट बाकी सगळ्या पक्षांना अनेकदा सिंगल डिजिट जागांवरच समाधान मानावे लागले. याचा अर्थ बाकी सर्व पक्षांचा राजकीय पाया महाराष्ट्रात काँग्रेस एवढा खोलवर आणि विस्तृत नाही. भाजप वगळून बाकी कुठल्याही पक्षांची “कमिटेड” व्होट बँक काँग्रेस एवढी मोठी नाही.
या पार्श्वभूमीवर हरियाणातला काँग्रेसचा पराभव फार मर्यादित अर्थानेच त्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परफॉर्मन्सवर परिणाम करण्याची शक्यता आहे. विशेषतः महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांचा “पॉलिटिकल डॉमिनन्स” काँग्रेस पर्सेप्शन पेक्षा कमीच सहन करण्याची शक्यता आहे. याचे कारण उघड आहे, काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या “बूस्टर डोस” हा हरियाणातल्या पराभवापेक्षा अधिक सकारात्मक दृष्ट्या परिणामकारक आहे. शिवाय हरियाणात जी काँग्रेसमध्ये गटबाजी होती, त्या प्रमाणात महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांमध्ये गटबाजी नाही. किंवा फारसा बेबनावही नाही. त्यामुळे एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या घालून आणि एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात घुसून काँग्रेस नेते एकमेकांना पाडण्याची किंवा खाली खेचण्याची निदान महाराष्ट्रात तरी सध्या शक्यता कमी आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला एकमुखी नेतृत्व नाही, हे खरे. त्या तुलनेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेतृत्व त्यांच्या पक्षांसाठी एकमुखी आहे आणि त्यांच्या भोवती सहानुभूतीचे थोडेफार वलय आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु ठाकरे काय किंवा पवार काय यांच्या विषयीचे मीडिया पर्सेप्शन त्यांच्या मूलभूत शक्तीपेक्षा अधिक आहे. त्या उलट काँग्रेसकडे एकमुखी नेतृत्व नसताना देखील काँग्रेसची संघटनात्मक पातळीवर बांधणी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्यापेक्षा अधिक मजबूत आहेत आणि याची पक्की जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना निश्चित आहे. शरद पवार हे भले मराठी माध्यमांच्या दृष्टीने “चाणक्य” असतील, पण काँग्रेस नेतेही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. उलट काँग्रेस हायकमांड मधले नेते तर पवारांसारख्या कित्येक नेत्यांचे “राजकीय बारसे” जेवले आहेत.
त्यामुळे काँग्रेसचे नेते हरियाणातल्या पराभवाचा धुरळा थोडा खाली बसू देतील. थोडे वातावरण निवळण्याची वाट पाहतील आणि मगच महाविकास आघाडीत ठाकरे + पवारांसमोर जागावाटपाच्या टेबलावर बसतील. तेव्हा काँग्रेसची ठाकरे आणि पवारांकडून जास्त जागा खेचण्याची कसोटी निश्चित असेल, पण काँग्रेसचे नेते देखील या दोन्ही नेत्यांसमोर इतका सोपा पेपर नक्की ठेवणार नाहीत, की त्यांना सहज डिस्टिंक्शन मिळू शकेल!! उलट हरियाणातल्या पराभवाचा धुरळा खाली बसल्यानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते त्या पराभवातून धडा घेऊन अधिक कसोशीने ठाकरे + पवारांसमोर बसून महाविकास आघाडीचा लगाम आपल्या हातात घट्ट धरण्याची दाट शक्यता आहे. कारण कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा काँग्रेसला सत्तेवरची मांड पक्की बसवण्याची सवय आहे. याबाबतीत भाजप मधले मोदी – शाहांचे अपवाद वगळता बाकी कुठल्याही पक्षांचे नेते काँग्रेस नेत्यांच्या पासंगालाही पुरत नाहीत.