Raj Thackeray : तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा तापणार, अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापणार असून अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण झाडेही जगली पाहिजे. सरकारने नवीन झाडे लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये, असे शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.



नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्ताने तपोवनात साधूसंतांसाठी साधूग्राम बांधले जाणार आहे. पण त्यासाठी 1800 झाडे तोडली जाणार आहेत. या झाडांची ओळखही पटवण्यात आली आहे. पण अभिनेते सयाजी शिंदेंसह अनेकांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही या प्रकरणी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी यांनी सोमवारी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर सयाजी शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला. त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. तपोवनातील झाडे कशी वाचली पाहिजेत? यावर त्यांच्याशी चर्चा झाली. भविष्यातही अशी झाडे वाचावीत यावरही त्यांच्यासोबत उहापोह झाला. या प्रकरणी झाडे इकडून तिकडे लावण्याने काही होत नाही. 15 फुटी झाडे लावण्याचा मुद्दा तर निव्वळ मजाक आहे. ज्या जागी झाडे आलीच नाही, त्या ठिकाणी ही झाडे कशी येतील?

तिथे मातीच तशी नसेल. पाणीही नसेल. त्यामुळे आहे ती झाडे कशाला तोडायची? सरकारने आहे ती झाडे तोडू नये. कुंभमेळा झाला पाहिजे. परंपरेनुसार सर्वकाही झाले पाहिजे. आमचा त्याला विरोध नाही. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ही नवीन झाडांच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये. महाराष्ट्रातील वनराई, देवराई कशी टिकली पाहिजे, फुलली पाहिजे, नवीन कशी तयार झाली पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोडीला राजकीय हेतूने प्रेरित पर्यावरणवादी विरोध करत असल्याची टीका केली होती. त्यांचा रोख सयाजी शिंदेंकडेच होता. पत्रकारांनी या प्रकरणी सयाजी यांना छेडले. पण त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. मला झाडांशिवाय असले काही कळत नाही. त्यामुळे त्यावर काय व्यक्त व्हावे हे मला कळत नाही. हा आपला प्रांत नाही, असे ते म्हणाले.

सरकार आमचे शत्रू नाही. आम्ही झाडांसाठी आंदोलन केले. आम्हाला झाडे हवी आहेत. ती आपली आई-वडील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्र येणारे सर्वचजण आमचे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झाडांसाठी घेतलेली भूमिका पाहून मला खूप चांगले वाटले. या प्रकरणी सर्वच अभिनेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन बोलले पाहिजे असे काही नाही. त्या सर्वांचे मत असे आहे की, झाडे वाचली पाहिजेत. पण काही पर्यावरणवादी झाडे वाचली नाही पाहिजे असे म्हणत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. पण वृक्षतोड व्हावी असे कुणालाच वाटत नाही, असेही सयाजी शिंदे या प्रकरणी बोलताना म्हणाले.

The issue of tree cutting in Tapovan will become a hot topic, actor Sayaji Shinde met Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या