परवाना नूतनीकरणावेळी मराठी भाषेचे ज्ञान तपासणार,परिवहनचा गृह विभागाकडे प्रस्ताव

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात वाहनचालकांना परवाना देताना तसेच त्याच्या नूतनीकरणाच्या वेळी मराठी भाषेचे ज्ञान तपासले जावे, यासाठी परिवहन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला असून, संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रस्तावानुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक ठरणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ही अट लागू केली जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्येही मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा विचार आहे. त्यामुळे भविष्यात चालकांना मराठीतून प्रवाशांशी संवाद साधणे अपेक्षित असेल.

याचबरोबर, विद्यमान चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या प्रक्रियेतही मोठा बदल होणार आहे. नूतनीकरण करताना चालकांना मराठीचे ज्ञान असल्याचे दाखवावे लागणार आहे. यामुळे राज्यातील सर्वच व्यावसायिक वाहनचालकांना मराठी शिकण्याची गरज निर्माण होणार आहे. प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 1 मे ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचवेळी चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आहे का, याचीही पडताळणी केली जाईल. या उपक्रमातून अमराठी चालकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यावर भर दिला जाणार असून, त्यांना आवश्यक तेवढी मराठी भाषा शिकवण्याची योजना आहे.



या प्रस्तावित नियमांमध्ये मोटार वाहन नियम 4, 78 आणि 85 मध्ये बदल करण्याचा विचार आहे. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, मसुदा अधिसूचना तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मसुद्यावर नागरिक, संघटना आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत मिळालेल्या सूचनांचा विचार केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीत अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच त्यांना भाषेचे व्यवहारिक प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी, तसेच ओला-उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांमध्ये मराठीचा वापर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे.

या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Transport Ministry proposes to Home Department

महत्वाच्या बातम्या