विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: देशातील अनेक भागांत एलपीजी पुरवठ्याबाबत अडचणी दिसत आहेत. बारामती आणि शिरूर परिसरात गॅसचा तुटवडा स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत सरकारने तुटवडा नाही असे का सांगितले जाते, असा सवाल करत एलपीजी वितरणाची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती आहे. या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. Supriya Sule
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुळे यांनी पुढे सांगितले की, आपण सरकारवर आरोप करण्यासाठी नव्हे तर वास्तव मांडण्यासाठी बोलत आहोत. माध्यमांनीही कोणत्याही दबावाला बळी न पडता परिस्थिती दाखवून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. आज देशातील सामान्य नागरिक आणि गृहिणी मोठ्या अडचणीत आहेत. वास्तविक परिस्थिती लपवून ठेवण्यापेक्षा सरकारने पुढे येऊन सत्य स्वीकारावे आणि योग्य उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
गॅसच्या कमतरतेमुळे अनेक व्यवसायांवरही परिणाम होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे काही उद्योग अडचणीत आले आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी कामगारांची संख्या कमी करण्यात आली आहे. काही ठिकाणी सुमारे पंच्याहत्तर टक्के कामगार कमी केल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती, पुणे, नाशिक, बीड, जळगाव आणि नागपूर या भागांतही अशीच परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. पूर्वी सिलिंडरसाठी रांगा लावून गॅस मिळत होता, मात्र आता तोही मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Why Is the Government Claiming There Is No Gas Shortage? Supriya Sule Questions
महत्वाच्या बातम्या