विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आणि विरोधी पक्ष सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, अजित पवार यांनी उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असा संकेत दिला आहे.
पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील पूरपरिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “सर्व मंत्री आणि आमदारांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांना लोकांच्या रोषाला, नाराजीला आणि रागाला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा घरदार उद्ध्वस्त होते, शेतीचे प्रचंड नुकसान होते आणि जमीन वाहून जाते, तेव्हा अशा प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबत निर्णय घेणार आहोत.”
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राशी संपर्क साधला आहे. केंद्राकडूनही मदत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. विविध विभागांची मदत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले जातील. उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करणार का, असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना अशी मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्यांना सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे वाटेल. येत्या दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या तातडीने ५,००० रुपये, अन्नधान्य, कपडे आणि निवारा यांसारखी मदत केली जात आहे.”
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे आता शेतकरी वर्गाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार कितपत यशस्वी होते, हे पाहावे लागेल.
Will a decision be taken on the wet drought in the cabinet meeting tomorrow? Ajit Pawar hints
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…