विशेष प्रतिनिधी
पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असून मुंबई–पुण्यासह राज्यातील अनेक भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. stormy rainfall
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पुढील तीन तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज (२१ एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मात्र विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम असून अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत अकोला आणि वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले. नागपूर आणि अमरावती येथे तापमान ४४ अंशांपेक्षा जास्त होते. तर भंडारा, गडचिरोली, यवतमाळसह अनेक भागांत ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, रविवारी दुपारनंतर राज्यातील काही भागांत अचानक पावसाने हजेरी लावली. सांगली, धाराशिव, नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी गारपीटही झाली. या अनपेक्षित पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, वायव्य भारतात उच्च स्तरावर वेगवान पश्चिमी वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
पुण्यासह रायगड, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Yellow alert issued in the state, warning of stormy rainfall in the next few hours
महत्वाच्या बातम्या