विशेष प्रतिनिधी
मुंबई : Assembly Passes Bill राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या डान्सबार प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डान्सबारविरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर झाले. या सुधारणांमुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्ये किंवा नियमबाह्य कार्यक्रम आयोजित करणाऱ्या बार चालकांवर आता थेट डान्सबारविरोधी कायद्यांतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.Assembly Passes Bill
राज्यात अनेक बारना महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत ऑर्केस्ट्रा सादर करण्यासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, या परवानगीचा गैरवापर करून काही ठिकाणी प्रत्यक्षात डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारी गृहविभागाकडे सातत्याने येत होत्या. विद्यमान कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत ऑर्केस्ट्राच्या आड अश्लील नृत्यांचे आयोजन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.Assembly Passes Bill
यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि बार रूम यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६ या दोन कायद्यांमध्ये बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या सुधारणांद्वारे ऑर्केस्ट्रा सादरीकरणालाही डान्सबारविरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे.
विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक आता विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. तेथेही मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सुधारित कायदा राज्यभर लागू होईल.
सरकारच्या मते, या सुधारणांमुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण, अश्लील सादरीकरणे आणि नियमबाह्य व्यवसायांना प्रभावी आळा बसण्यास मदत होईल. तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिक बळकट होईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बार चालकांविरोधात यापुढे अधिक कठोर कारवाई करता येणार असल्याने ऑर्केस्ट्राच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Assembly Passes Bill to Rein in Dance Bars Operating as Orchestras
महत्वाच्या बातम्या