CM Fadnavis : तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना थेट सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तीव्र आणि खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात २० वर्षांनंतर आल्यावर “जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय” असे विधान केल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी “तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं होतं? कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होतात?” असा थेट सवाल उपस्थित केला.CM Fadnavis

कांदिवलीतील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज ठाकरे म्हणतात २० वर्षांनी जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय. पण तुम्हाला जेलमध्ये कोणी पाठवलं? मातोश्रीवरून शिवतीर्थावर गेलात, म्हणजे शिवतीर्थ जेल आहे का? आता शिक्षा संपली का?” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.CM Fadnavis



फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही टीका करताना सांगितले की, “हा प्रीतीसंगम नाही, तर भीतीसंगम आहे.” राज ठाकरेंच्या देहबोलीवर भाष्य करत त्यांनी म्हटले की, “आज राज ठाकरे नेहमीसारखे वाटत नव्हते. त्यांची बॉडी लँग्वेजच वेगळी दिसत होती.”

संयुक्त वचननाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज जाहीर झालेला दस्तऐवज वचननामा नव्हता, तर वाचूननामा होता. त्यांनी काय वाचलं, ते त्यांनाही माहीत नव्हतं. वचननामा देण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच होता.”

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात येताना जुन्या आठवणींना उजाळा देत “२० वर्षांनी इथे आल्यावर सुटून आल्यासारखं वाटतंय” असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरूनच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या या थेट सवालामुळे, मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Who Sent You to Jail?” CM Fadnavis Takes a Direct Dig at Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या