Pune MahanagarPalika : आमदार–खासदारांचे नातेवाईकांना कट, भाजपची सुधारित यादी तयार, वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीनंतर घराणेशाहीला ब्रेक

विशेष प्रतिनिधी

पुणे: Pune MahanagarPalika पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून, आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावर वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्यानंतर घराणेशाहीला चाप देत अनेक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी थेट सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्यानंतर भाजपकडून सुधारित उमेदवार यादी तयार करण्यात आली आहे. प्रदेश भाजपच्या अंतिम मान्यतेनंतरच ही यादी जाहीर होणार आहे.Pune MahanagarPalika

भाजपने महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ७० उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तबही करण्यात आला होता. मात्र, या यादीत मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी, नेते तसेच आमदार–खासदारांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही यादी तातडीने जाहीर न करता वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली.Pune MahanagarPalika



सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ नेत्यांनी या यादीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “नातेवाईकांऐवजी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे रविवारी होणार असल्याचे सांगितले जाणारे उमेदवार घोषणापत्र लांबणीवर पडले आहे.

दरम्यान, पुण्यातील कोअर कमिटीच्या बैठकीत १०० हून अधिक नावांना प्राथमिक मान्यता देण्यात आली होती. मात्र, अनेक प्रभागांमध्ये भाजपने बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्यानेही असंतोषाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या यादीत जर बाहेरून आलेल्या नेत्यांची नावे असतील, तर जुने भाजप पदाधिकारी नाराज होऊ शकतात, अशी भीती पक्षात आहे.

याशिवाय, मागील निवडणुकीतील काही नगरसेवकांचेही पत्ते कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहर भाजपमध्ये जबाबदारी सांभाळणारे अनेक पदाधिकारी तसेच आमदार–खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या आणि त्यांच्या नावांची शिफारसही झाली होती.

मात्र, वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टपणे हस्तक्षेप करत “कार्यकर्त्यांना प्राधान्य” देण्याची भूमिका घेतल्याने भाजपची उमेदवार यादी पुन्हा एकदा बदलण्यात येत आहे. ही सुधारित यादी लवकरच प्रदेश भाजपकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतरच पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

राजकीय वर्तुळात मात्र, भाजपमध्ये घराणेशाहीविरोधात सुरू झालेली ही कारवाई आगामी निवडणुकीत नवा संदेश देणारी ठरेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Conspiracy against relatives of MLAs and MPs, BJP’s revised list prepared, break to dynastic rule after displeasure of senior leaders

महत्वाच्या बातम्या