विशेष प्रतिनिधी
पुणे : Prakash Ambedkar आगामी काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचा टप्पा येऊ शकतो आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून दिसतील, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पुण्यात केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर भाजपची भूमिका बदलली असून, हीच बाब नेतृत्व बदलाची नांदी असल्याचा दावा त्यांनी केला.Prakash Ambedkar
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करण्यापूर्वी अॅड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपने राज्यातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांच्या वक्तव्यात बदल दिसून येत असून, या निवडणुका शिंदेंच्या शिवसेनेसह लढणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. याचा अर्थ शिंदे यांनी अमित शहांना खिशात घातले असून, राज्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.Prakash Ambedkar
भाजपला महापालिका निवडणुकांत स्वबळाचा नारा मागे घ्यावा लागत आहे, यावरून एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले, तर महाराष्ट्राला आश्चर्य वाटण्याचे कारण राहणार नाही, असे आंबेडकर म्हणाले. शरद पवार हे चाणक्य राजकारणी असल्याबाबत कोणतेही दुमत नाही. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली बैठक ही केवळ औपचारिक नव्हती, तर त्यातून जो संदेश द्यायचा होता, तो देण्यात आला आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, राज्यात ऊस आणि कापूस ही दोन महत्त्वाची पिके आहेत. मात्र, कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा तीव्र होत आहे. हा प्रश्न पुढील काळात अधिक उग्र रूप धारण करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
विधिमंडळातील विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसले तरी सत्ताधारी भाजपने राजकीय नैतिकता दाखवत मन मोठे करून विरोधी पक्षांपैकी मोठ्या पक्षाला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद द्यायला हवे होते. मात्र, तसे न करता भाजप सर्वच पक्ष संपविण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला.
महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांबाबत वंचितची भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले की, नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांत वंचितने भाजप वगळता विविध राजकीय पक्षांशी युती व आघाडी केली आहे. याच धर्तीवर आगामी महापालिका निवडणुकाही युती किंवा आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्यात येतील. राज्यभर एकच धोरण ठरविणे शक्य नसल्याने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. भाजप सोडून डावे-उजवे सर्व पक्ष आमच्यासाठी चालतील. राजकीय खेळ सुरू झाला असून पुढे काय घडते, त्यानुसार वंचितची भूमिका ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde will be the Chief Minister again next month; Prakash Ambedkar predicts
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप