विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर निवडणूक विषयक कर्तव्यासाठी हजर न राहिल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अम्मिता गाडीवडर यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी तात्काळ प्रभावाने निलंबनाचे आदेश बजावले आहेत.
पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या कालावधीतील सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय व प्रत्यक्ष कार्यवाही सध्या जोरात सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील तसेच इतर शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक कामासाठी उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक विषयक कर्तव्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अम्मिता गाडीवडर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना बजावलेल्या आदेशानुसार त्या संबंधित ठिकाणी कर्तव्यावर हजर राहिल्या नाहीत.
निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १४ मधील तरतुदी तसेच राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या आधारे ही जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येते. या आदेशांचे पालन न केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाण्याची तरतूद आहे. गाडीवडर यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा समाधानकारक कारण न देता कर्तव्यावर अनुपस्थिती दर्शविल्याने निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या निवडणूक कामकाजात मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळ नियोजन, साहित्य वितरण, मतदार यादीविषयक कामे आदी महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश असतो. या प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. काही कर्मचारी नियुक्तीनंतरही संबंधित क्षेत्रीय कार्यालयात हजर न राहिल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शिस्तभंगाच्या घटनांकडे महापालिका प्रशासन गंभीरपणे पाहत आहे.
दरम्यान, निवडणूक विषयक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Junior engineer suspended for not appearing for election work
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल