सार्वजनिक वाहतुकीला चालना; मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतने प्रवास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : .सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर व्हावा आणि पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डी असा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री स्वतः रेल्वेने प्रवासाला निघाल्याने या कृतीची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डीकडे रवाना होताना माध्यमांशी संवाद साधताना वाढती वाहतूक कोंडी, इंधनाचा वाढता वापर आणि प्रदूषण या गंभीर समस्या लक्षात घेता नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. रेल्वे, मेट्रो आणि बस यांसारख्या साधनांचा वापर वाढल्यास शहरांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.



वंदे भारत एक्सप्रेससारख्या आधुनिक रेल्वे सेवांमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारकडून देशभरात आधुनिक रेल्वे सुविधा वाढवण्यात येत असून महाराष्ट्रालाही त्याचा मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई ते शिर्डी हा प्रवास कमी वेळात आणि अधिक सुविधांसह पूर्ण होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांकडून वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रवासाकडे केवळ औपचारिक दौरा म्हणून नव्हे, तर एक प्रतीकात्मक संदेश म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील मंत्री, अधिकारी आणि नागरिकांनी शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवला, तर वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही मोठी मदत होऊ शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.

Maharashtra CM Devendra Fadnavis travels by Vande Bharat to promote public transport

 

महत्वाच्या बातम्या