Bawankule : मागची पाने उघडली, तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही : सिंचन घोटाळ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : Bawankule पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे. “मागची पाने उघडली, तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही,” असे तीव्र वक्तव्य बावनकुळे यांनी केले.Bawankule

दिघी–बोपखेल (प्रभाग क्रमांक ४) येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी सैनिकांशी संवाद साधताना बावनकुळे बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कार्यकाळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.Bawankule

₹७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. “बोलण्यासारखे खूप आहे, पण आज तो दिवस नाही. योग्यवेळी सर्व काही बोलले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.Bawankule



अजित पवारांच्या वक्तव्यांवर टीका करत बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीत महापालिका निवडणूक मैत्रीपूर्ण लढण्याचे ठरले होते. “आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी टाळायची, असे स्पष्ट ठरले होते. अजित पवारांनी त्या समजुतीचा मान ठेवणे अपेक्षित होते,” असे ते म्हणाले.

“अजित पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी अशा बाबी स्थानिक निवडणुकीत काढू नयेत. पिंपरी-चिंचवडवर अनेक वर्षे त्यांचाच प्रभाव होता. जर आपण मागची पाने उघडायला सुरुवात केली, तर त्यांनाही बोलता येणार नाही,” असा कडक इशाराही बावनकुळे यांनी दिला. मात्र, “आमची मागची पाने उघडण्याची कोणतीही इच्छा नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंचन घोटाळ्यातील आरोपांवर अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “हे अभिमानास्पद नाही. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. निकालाची वाट पाहून पुढे जायला हवे.”

दरम्यान, निवडणुकीनंतर भाजपला कोणत्याही मित्रपक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही, असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल. ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून दोन-तृतीयांश बहुमतासह भाजपचाच महापौर होईल.”

या तीव्र शाब्दिक हल्ल्यांमुळे ‘मैत्रीपूर्ण लढत’ म्हणवली जाणारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आता अधिक आक्रमक वळणावर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“Open Old Files and Ajit Pawar Won’t Be Able to Speak”: Bawankule Warns Over Irrigation Scam

महत्वाच्या बातम्या