Pune Civic Polls : पुणे महापालिकेसाठी शिवसेना, काँग्रेस, मनसेसह समविचारी पक्ष सोबत ; काँग्रेस ६० जागा तर शिवसेना ४५ जागांवर एकमत

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune Civic Polls  पुणे महापालिकेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि मनसेसह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी अखेर पक्की झाली असून, पहिल्या टप्प्यातील जागावाटपावर दोन्ही प्रमुख पक्षांत एकमत झाले आहे. काँग्रेसला ६० तर शिवसेनेला ४५ जागा देण्याचा निर्णय अंतिम झाला असून, त्या जागांवरील उमेदवारांना संबंधित पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरित जागांचे वाटप अंतिम टप्प्यात असून, मंगळवारी सकाळपर्यंत सर्व जागावाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.Pune Civic Polls

या वेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, उपनेते तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे पुणे शहर प्रभारी आमदार सतेज पाटील, माजी नगरसेवक प्रशांत बधे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, अ‍ॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.Pune Civic Polls



सचिन अहिर यांनी सांगितले की, सुमारे ९० टक्के जागांवर एकमत झाले आहे. मनसेसोबत चर्चा सुरू असून, मनसेने ३२ जागांची यादी दिली आहे. त्यातील २१ जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेनुसार जागावाटप झाले असून, दोन्ही पक्ष त्यांच्या कोट्यातील काही जागा समविचारी पक्षांना देणार आहेत. त्या चर्चा सुरू असल्याने उर्वरित जागांवर अंतिम निर्णय झालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या भूमिकेतील बदलावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांनी स्वतः अंकुश काकडे यांच्याशी चर्चा केली होती; मात्र त्यानंतर ते चर्चेला आले नाहीत. महाविकास आघाडीत प्रमुख तीन पक्षांमध्ये चर्चा करूनच जागावाटप केले जाते. त्यामुळे यावेळी गाफील न राहता दक्षता घेतली गेली आणि कोण कुठे गेले तरी आमची चर्चा सुरूच होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात शिवसेना आणि काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा अहिर यांनी केला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सत्तेतील पक्ष असून, निवडणुकीत विरोधकांना जागाच न ठेवण्याचे नियोजन भाजपकडून केले गेले होते, असा आरोप त्यांनी केला. सध्या निवडणुकीपुरता तात्पुरता घटस्फोट दाखवला जात असून, निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याची भूमिका दिसत असल्याचेही ते म्हणाले. पुणेकरांना या गोष्टी लक्षात येत असून, काँग्रेस आणि शिवसेनेने पुण्यात सक्षम पर्याय दिला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीकडून गेल्या सात वर्षांत पुण्याचे वाटोळे झाल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, पाणी आणि कचरा व्यवस्थापन या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांच्या काळात नकारात्मकता वाढली आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री तुमचे असतानाही पुण्याला २२ टीएमसी पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्तेचा वापर सोयीस्कर पद्धतीने केला जात असल्याने, शिवसेना आणि काँग्रेसच्या माध्यमातून पुणेकरांना चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले. ‘पुणे फर्स्ट’ला प्राधान्य देत महाविकास आघाडीचा जाहीरनामा ४ किंवा ५ जानेवारीला प्रसिद्ध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shiv Sena, Congress, MNS Forge Alliance for Pune Civic Polls; Congress Gets 60 Seats, Sena 45

महत्वाच्या बातम्या