विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ऑफर होत्या. मात्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला असा पलटवार माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केला.
दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पेपरफुटी कायद्याच्या संदर्भातील गौरव सोहळा आणि रोगनिदान शिबिराच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि मजबूत नेतृत्व करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.”
उद्धव ठाकरे यांच्या “बच्चू कडूंना मंत्री केले ही आमची चूक होती” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सवाल केला की, “पहिले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की मी मंत्री झालो? आम्ही अपक्ष आमदारांनी त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला, हे त्यांनी विसरू नये.”
त्यांनी दावा केला की त्यावेळी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही त्यांना ऑफर होत्या, मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांनी साथ दिली. “शिंदे साहेबांनीच आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घालून दिली आणि शिवसेनेसोबत राहण्याचा आग्रह केला होता,” असेही त्यांनी सांगितले.
सत्तेसाठी शिंदे गटात गेल्याच्या आरोपांवर उत्तर देताना बच्चू कडूंनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे उदाहरण देत माध्यमांवरही प्रश्न उपस्थित केले.
शेतकऱ्यांना इंधनासाठी 7/12 मागितले जात असल्यास आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळावे यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नीट पेपर लीक प्रकरणावर बोलताना बच्चू कडू यांनी “पेपरफुटी करणाऱ्यांना फाशी द्या,” अशी मागणी केली.
“We Backed Uddhav Thackeray for CM Post”; Bachchu Kadu Hits Back
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश