माझी आणि परळीची बदनामी केली त्यांना जबरदस्त चपराक, परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

बीड : अत्यंत चुरशीच्या झालेल्या परळी नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडा यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. ज्यांनी माझी आणि परळीची बदनामी केली त्यांच्या तोंडात जबरदस्त चपराक परळीच्या माय-बाप जनतेने लगावली असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडे महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर काही दिवसांतच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाची घटना समोर आली. यामध्ये मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप झाला, त्याला अटक करण्यात आली. मात्र धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा आणि त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत परळीतील गुंडगिरी, माफिया यांच्याबद्दल आवाज उठवला. सरपंच हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला.



धनंजय मुंडे म्हणाले की, “परळीच्या माय-बाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, रिपाई महायुतीला आज या ठिकाणी जनतेने कौल दिला आहे. एक-दोन जागा सोडल्या तर संपूर्ण निकाल महायुतीच्या बाजूने आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार 16 हजार एवढे ऐतिहासिक मताधिक्य घेऊन विजयी झाला आहे.” धनंजय मुंडे म्हणाले की, ज्यांनी माझ्यावर टीका केली. ज्यांनी मला आणि परळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना परळीच्या मतदारांनी ही जोरदार चपराक लगावली आहे. महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

मुंडे म्हणाले की, खासदार बजरंग सोनवणे तळ ठोकून राहू द्या किंवा येथेच मुक्कामाला राहिले तरी परळीच्या माय-बाप जनतेच्या मतांमध्ये कोणताच फरक पडणार नव्हता. हे आजच्या निकालाने दाखवून दिले आहे.

Dhananjay Munde After Parli Victory

महत्वाच्या बातम्या