मालवणमधील पराभव नारायण राणेंमुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मालवणमधील पराभवानंतर भाजपामधला अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यासाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जबाबदार धरले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपा नेते नितेश राणे विरुद्ध शिवसेना आमदार निलेश राणे हे दोन्ही भाऊ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आमने-सामने आले होते . वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपरिषदांमध्ये भाजप तर मालवणमध्ये शिवसेना आणि कणकवली नगरपंचायतीवर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले आहेत.

मालवणमधील पराभवानंतर नितेश राणे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो… पण काही गोष्टी बोलल्या नाही, तर खऱ्या वाटायला लागतात… पण आता ती वेळ आली आहे.

रविंद्र चव्हाण म्हणाले की, मालवणच्या निवडणुकीत आपण एकदाच प्रचाराला गेलो होता. आम्ही सावंतवाडी आणि वेंगुर्ला या नगरपरिषद जिंकलो आहोत. पण मालवण आणि कणकवलीमध्ये आमचा पराभव झाला हे मान्य करावे लागेल. मालवण येथे अपयश आले, कारण या निवडणुकीत खासदार नारायण राणे हे भाजपाच्या प्रचाराला आले नाहीत. त्याचा फटका पक्षाला बसला. नारायण राणे यांनी प्रचार करायला हवा होता. कारण निलेश राणे सुद्धा सांगत होते की, नारायण राणे हे त्यांच्यासोबत होते. त्याचा फटका आम्हाल नक्कीच बसला.

रविंद्र चव्हाण म्हणाले की, कोकणात आम्ही अनेक नगरपरिषदा पहिल्यांदा जिंकल्या आहेत. पण चर्चा मात्र मालवणचीच होत आहे. कारण विजयापेक्षा पराभवची अधिक चर्चा होते. ज्या ठिकाणी पराभव झाला आहे, त्या ठिकाणी आम्ही चिंतन नक्कीच करू. तसेच पराभवाची कारणं शोधू आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेऊ, अशी भूमिका रविंद्र चव्हाण यांनी मांडली.

Defeat in Malvan due to Narayan Rane, targeted by BJP state president Ravindra Chavan

महत्वाच्या बातम्या