विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य शासनाने सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार आरक्षण जाहीर करण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणूक पार पाडण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण केली जाणार आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार २२ जानेवारी २०२६ रोजी सर्व महानगरपालिकांतील महापौर पदासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया सुरू होणार असून २३ जानेवारीपासून नगर सचिव आणि संबंधित विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून महापौर व उपमहापौर निवडीसाठीची तयारी केली जाणार आहे. यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बोलावण्यासाठी तारीख, वेळ आणि स्थळ निश्चित करण्याची जबाबदारी नगर सचिवांवर असणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांसाठी २३ जानेवारी रोजी नगर सचिवांकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाच्या आधारे विभागीय आयुक्त २४ व २५ जानेवारीदरम्यान महापालिकेच्या पहिल्या सभेची तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी निश्चित करतील. या सभेची अधिकृत माहिती स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. २३ ते २४ जानेवारीदरम्यान मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बोलावण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर २७ व २८ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्यांनी आपली नामनिर्देशने महापालिकेच्या नगर सचिवांकडे सादर करायची आहेत.
सर्व महापालिकांमध्ये, तसेच बृहन्मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे, ३० व ३१ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर प्रलंबित असलेली सत्तास्थापना प्रक्रिया अखेर पूर्णत्वास जाणार आहे.
या कार्यक्रमामुळे राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय सत्तेऐवजी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Mayor–Deputy Mayor Election Schedule Announced in Municipal Corporations; Power Formation by Month-End
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!