विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक व दुर्दैवी निधनाने पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील व्यापारी वर्गानेही तीव्र दुःख व्यक्त केले असून, श्रद्धांजली म्हणून गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील सर्व दुकाने संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणे (पुणे व्यापारी महासंघ) यांच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष फतेचंद का. रांका व सचिव महेंद्र पितळिया यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, अजितदादा पवार यांचे निधन ही पुणे शहरातील व्यापारी बांधवांसाठी तसेच राज्यासाठी अपरिमित हानी आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, अजितदादा पवार हे जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारे, कर्तव्यदक्ष, परखड व प्रभावी नेतृत्व होते. राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच उद्योग, व्यवसाय आणि व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते कायम स्मरणात राहील.
या दुःखद प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाच्यावतीने अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती व असंख्य समर्थकांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व या कठीण काळात कुटुंबीयांना आणि अनुयायांना दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही करण्यात आली आहे.
अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी आपली दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवावीत, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाने केले आहे.
Traders Mourn Ajit Pawar’s Demise; All Shops in Pune to Remain Closed on January 29
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास