विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवरून शरद पवार गटाला जोरदार फटकारले आहे. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार होते, तसेच 12 फेब्रुवारीला याबाबत घोषणा होणार होती, असा दावा शरद पवार गटातील नेते करत असताना फडणवीसांनी या दाव्यांवर तीव्र आक्षेप घेतला.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, जर अजित पवार विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते, तर ती चर्चा एनडीएमधून बाहेर पडण्यासाठी होती का, सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार होता का, हे स्पष्ट केले पाहिजे. प्रत्यक्षात अजित पवार सरकारमध्ये पूर्णपणे स्थिर होते. रोज काहीतरी गोंधळ निर्माण करणे आणि स्वतःच्या इकोसिस्टमद्वारे त्याला बळ देणे हे अत्यंत अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा खुलासा करताना सांगितले की, अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाच्या आदल्या दिवशी आपण आणि अजित पवार जवळपास एक तास एकत्र बसून चर्चा करत होतो. “आमचे संबंध अतिशय चांगले होते. अजितदादा अनेक गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निधनावर खालच्या स्तराचे राजकारण करणे योग्य नाही,” असे फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या दोन वेगवेगळे पक्ष अस्तित्वात आहेत, एक शरद पवार यांचा आणि दुसरा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावे, असा निर्णय घेतला असून, तो निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्या निर्णयावर भाजप किंवा एनडीएचा हस्तक्षेप नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करायची की नाही, कोणता निर्णय घ्यायचा, हे 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वातंत्र्य आहे. मात्र, असा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित आहे. ती चर्चा आधीही झाली आहे आणि पुढेही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमची भूमिका स्पष्ट आहे, आमचे साथीदार अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला, त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे, असे सांगत फडणवीसांनी शपथविधीच्या वेळेवरून होत असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. परिस्थितीनुसार पक्ष निर्णय घेत असतात, याचे उदाहरण देत त्यांनी टीकाकारांना इशाराही दिला की, मला राजकारण करायचे नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सविस्तर सांगू शकतो.
Devendra Fadnavis Slams Sharad Pawar Faction Over Merger Speculation
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास