भारत – अमेरिका करारामागील धुरंधर..अजित डोवाल यांचा थेट ट्रम्प यांना वक्तव्ये थांबविण्याचा इशारा!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले होते. मात्र नुकताच अमेरिकेने भारताशी व्यापार करार करून टेरीफही कमी केले. यामागे भारताचे धुरंधर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची मुत्सद्देगिरी असल्याचे समोर आले आहे. Ajit Doval

अमेरिकन मीडिया ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना वॉशिंग्टनला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या चर्चेत डोभाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत अमेरिकेसोबत सुरू असलेली कटुता संपवू इच्छितो आणि पुन्हा व्यापार करारावर चर्चा सुरू करण्यास तयार आहे. तथापि, अजित डोवाल यांनी हे देखील स्पष्ट केले की भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही.

अजित डोवाल म्हणाले की, जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने कठोर भूमिका घेतली, तर भारत सध्याच्या सरकारच्या कार्यकाळ संपण्याची वाट पाहू शकतो. भारताने यापूर्वीही अमेरिकेतील कठीण सरकारांचा सामना केला आहे. भारताला असे वाटते की ट्रम्प आणि त्यांचे सहयोगी यांनी भारताविरोधात उघडपणे वक्तव्य करणे थांबवावे, जेणेकरून संबंध पुन्हा रुळावर येऊ शकतील.

त्यावेळी भारत ट्रम्प यांच्या वक्तव्यांवरून नाराज होता, कारण ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% कर लावला होता. ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘डेड’ (मृत) म्हटले होते आणि आरोप केला होता की भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धात मदत करत आहे.

अजित डोवाल यांच्या या चर्चेनंतर काही दिवसांतच परिस्थिती बदलू लागली. 16 सप्टेंबर रोजी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त फोन केला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये आणखी चार वेळा फोनवर चर्चा झाली. याच दरम्यान दोन्ही देश कर कमी करण्याच्या कराराच्या दिशेने वाटचाल करत राहिले.



सोमवारी ट्रम्प यांनी अचानक सोशल मीडियावर सांगितले की, भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाला आहे. यानुसार, भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचा कर 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारतावर लावलेला 25% अतिरिक्त कर देखील काढून टाकण्यात आला आहे.

ट्रम्प म्हणाले की, या बदल्यात भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरचा माल खरेदी करेल, व्हेनेझुएलाकडून तेल घेईल आणि अमेरिकन वस्तूंवरील कर पूर्णपणे रद्द करेल. मात्र, भारत सरकारने या गोष्टींची अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही आणि कोणताही लेखी करारही समोर आलेला नाही.

विशेष म्हणजे, नवी दिल्लीतील अनेक मोठे अधिकारीही या घोषणेने थक्क झाले. व्यापार चर्चेत सहभागी असलेल्या लोकांनाही त्या दिवशी मोदी आणि ट्रम्प यांच्या कॉलची आधीपासून माहिती नव्हती.

Dhurandhar Behind the India–US Deal: Ajit Doval Warns Trump to Refrain From Provocative Statements

महत्वाच्या बातम्या