Influencer : ममतांचा राजकीय सूड, टीएमसीविरोधी रीलनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या अटकेवर वादळ

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : Influencer  पश्चिम बंगालमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शमिक अधिकारी यांच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. टीएमसीविरोधात तीव्र टीका असणारा रील व्हायरल झाल्यानंतर काहीच दिवसांत शमिक अधिकारी यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने ही कारवाई राजकीय सूडातून झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.Influencer

कोलकाता पोलिसांनी २५ वर्षीय शमिक अधिकारी उर्फ ‘नॉनसेन’ यांना ५ फेब्रुवारी रोजी दमदम परिसरातून अटक केली. सुरुवातीला चुकीच्या नजरेने पाहणे, मारहाण आणि बेकायदेशीर नजरकैद या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र २२ वर्षीय पीडितेच्या जबाबावरून नंतर बलात्काराचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये जोडण्यात आला. न्यायालयाने शमिक यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Influencer



पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तिला बेहाला येथील घरात जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले. या काळात मारहाण, धमक्या आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे. वैद्यकीय तपासणीत तिच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

दरम्यान, शमिक अधिकारी यांची अटक ही त्यांच्या टीएमसीविरोधी रीलमुळेच झाली असल्याचा आरोप सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होत आहे. २१ जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या या रीलमध्ये त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर गुंडगिरी, महिलांची असुरक्षितता, शिक्षक भरती घोटाळा आणि आर. जी. कर बलात्कार-हत्येचा संदर्भ देत जोरदार टीका केली होती. ही रील लाखो लोकांनी पाहिली असून ती राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष गाजली होती.

शमिक यांच्याकडे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मिळून आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर हा विषय केवळ गुन्हेगारी न राहता राजकीय बनल्याचे चित्र आहे. बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले की, दोघांमध्ये जुनी ओळख होती आणि घटनेबाबत गैरसमज झाला असून जबरदस्ती झाली नसल्याचा दावा केला.

एकीकडे गंभीर आरोपांची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे “टीएमसीविरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे का?” असा सवाल विरोधक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Political Vendetta Alleged; Influencer Arrested After Anti-TMC Reel Sparks Storm

महत्वाच्या बातम्या