Mulund Metro Crash : मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी ५ जणांना अटक, कार्यकारी अभियंता निलंबित

विशेष 

मुंबई : Mulund Metro Crash  मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रो लाईन ४ च्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करत पाच जणांना अटक केली असून संबंधित कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.Mulund Metro Crash

शनिवारी दुपारी वडाळा–ठाणे–कासारवडवली मार्गिकेच्या कामादरम्यान संबंधित संरचनेचा काही भाग कोसळल्याने हा अपघात झाला. एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.Mulund Metro Crash



या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ११०, ३२४(५) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान प्रकल्पाशी संबंधित पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरभ सिंह, पर्यवेक्षक प्रशांत भोईर आणि प्रकल्प व्यवस्थापक अवधूत इनामदार यांचा समावेश आहे. चौहान, सपकाळ, सिंह आणि भोईर हे मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स-अस्ताल्दी जेव्हीच्या सबकॉन्ट्रॅक्टर कंपनीशी संबंधित आहेत, तर इनामदार हे डीबी हिल एलबीजी या सल्लागार कंपनीशी संबंधित आहेत.

प्राथमिक चौकशीत सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये त्रुटी आणि देखरेखीतील हलगर्जीपणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाची जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंता सत्यजीत साळवे यांना निलंबित केले आहे.

या दुर्घटनेमुळे शहरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Mulund Metro Crash: 1 Dead, 3 Injured; 5 Arrested, Executive Engineer Suspended

महत्वाच्या बातम्या