मदत हवी असेल तर शिंदेसाहेबांना फोन करा, उद्धव ठाकरेंना नरेश म्हस्केंचा उपरोधिक सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद सदस्यत्वावरून चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा विधान परिषदेत येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाकडून मात्र त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक सल्ला दिला आहे. Uddhav Thackeray

पत्रकारांशी बोलताना म्हस्के म्हणाले की, दिल्लीसमोर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. “शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत. तुम्ही त्यांना फोन केला तर ते नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील,” असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.



याचवेळी म्हस्के यांनी राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे गटावरही टीका केली. त्यांच्या मते, राज्यसभा निवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवार न देण्यामागे वेगळीच कारणे होती. पक्षातील काही आमदार फुटण्याची शक्यता असल्याने त्यांनी उमेदवार दिला नाही, असा दावा त्यांनी केला. उमेदवार दिला असता तरी तो निवडून आला नसता, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, सध्या विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे सध्या ‘ऑपरेशन टायगर’ शांत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र पुढील काळात राजकीय घडामोडी वेगाने बदलू शकतात, असा संकेतही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीवर लक्ष मे महिन्यात विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत. मात्र सध्याच्या विधानसभा संख्याबळानुसार महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे.

या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड होते आणि अंतिम निर्णय काय घेतला जातो, यावरच उद्धव ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे.

Call Shinde If You Need Help, Naresh Mhaske’s Jibe at Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या