Ajit Pawar अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण : ‘माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा’, व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा सीआयडीसमोर जबाब

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बारामतीजवळ झालेल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासात नवे तपशील समोर येत आहेत. या प्रकरणात व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी सीआयडीसमोर महत्त्वाचा जबाब नोंदवला आहे. या दुर्घटनेत माझी कोणतीही चूक आढळल्यास मला कठोर शिक्षा द्यावी, असे त्यांनी चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. Ajit Pawar

या अपघाताबाबत अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीतील काही त्रुटींचा उल्लेख करत या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामती पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही या प्रकरणात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.



तपासाचा भाग म्हणून सीआयडीने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी केली आहे. मात्र या चौकशीदरम्यान कोणते मुद्दे विचारण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपास प्रक्रियेत गोपनीयता राखली जात असल्याचे सीआयडीकडून सांगण्यात आले आहे.

ही दुर्घटना २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली होती. मुंबईहून बारामतीकडे जाणारे छोटे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला आग लागून मोठा स्फोट झाला आणि विमान पूर्णपणे जळून खाक झाले.

या भीषण दुर्घटनेत अजित पवार, पायलट सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, त्या दिवशी विमान उडवण्यासाठी नियोजित पायलट साहिल मदान वाहतूक कोंडीत अडकल्याने शेवटच्या क्षणी सुमित कपूर यांना विमान उडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे या अपघातामागील नेमके कारण काय, हे शोधण्यासाठी तपास यंत्रणा तांत्रिक तपास, विमान कंपनीची कार्यपद्धती आणि उड्डाणाशी संबंधित विविध बाबींची सखोल चौकशी करत आहेत.

‘Punish Me if I’m at Fault’: VSR Owner V.K. Singh’s Statement to CID in Ajit Pawar Plane Crash Probe

महत्वाच्या बातम्या