विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याची घोषणा केली. ही कार्यालये पुणे, नांदेड, सातारा, सोलापूर, नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यांत होणार आहे. या कार्यालयांमुळे त्या त्या भागातील नागरिकांची प्रशासकीय कामाच्या संदर्भात मोठी सोय होणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने, शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरी क्षेत्रातील वाढलेली लोकसंख्या, जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप व या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.
जिल्ह्यांची लोकसंख्या, जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र, जिल्ह्याचे दुर्गम क्षेत्र, तालुक्यांची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये निर्मिती प्रस्तावित केली होती. विभागाच्या प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9 जानेवारी 2026 च्या बैठकीत 11 नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये व प्रत्येक कार्यालयात एकूण 13 पदे याप्रमाणे 143 पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या 10 फेब्रुवारीच्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील एस 25 वेतन श्रेणीतील 11 पदे निर्माण करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली. असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.
हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व नागपूर याठिकाणी प्रस्तावित करण्यात आली आहेत. याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता लवकरच विभागीय आयुक्त हे कार्यालय कुठे असणार? हे ठरवण्यात येईल. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती होईल, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मोजणी प्रकरणातील जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी परवानाधारक भूमापक, भूमापन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचेही निवेदन केले. सरकारच्या या निर्णयाचाही राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
11 Additional Collector Offices to Be Set Up Across Maharashtra, Announces Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा