काँग्रेसकडून घबराट पसरवली जातेय; महाराष्ट्रात गॅस टंचाई नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात एलपीजी सिलिंडरची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना गॅस एजन्सीकडे गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. विरोधक, विशेषतः काँग्रेस राज्यात गॅस टंचाईबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. LPG Shortage

चंद्रपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्यामुळे अनेक शहरांमध्ये एलपीजी वितरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि गॅस वितरण कंपन्यांनी राज्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.



मुख्यमंत्री म्हणाले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे नागरिक पहाटेपासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत आहेत. काही ठिकाणी नागरिक पहाटे तीन वाजल्यापासून सिलिंडरसाठी रांगेत उभे राहत असल्याचेही दिसून आले आहे. या परिस्थितीमुळे काही लहान हॉटेल्स आणि उपहारगृहांच्या कामकाजावरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले की, गॅससाठी अनावश्यक गर्दी करण्याऐवजी नियमित ऑनलाइन बुकिंग प्रणालीचा वापर करावा. त्यानुसार सिलिंडर वेळेत मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही.

राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून राज्यात एलपीजीचा पुरवठा स्थिर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

No LPG Shortage In Maharashtra:CM

महत्वाच्या बातम्या