विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्या वक्तव्यांबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची काही वक्तव्ये आणि कृतींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तिवारी यांनी केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पुणे शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या सर्व धर्म, जाती आणि समुदायातील लोकांनी शांततेने नांदणारे शहर आहे. मात्र अलीकडील काळात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या काही सार्वजनिक वक्तव्यांमुळे तसेच विविध ठिकाणी केलेल्या कृतींमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
तसेच काही ठिकाणी दर्ग्यात कार्यकर्त्यांसह जाणे, हिरव्या रंगावर भगवा रंग फासण्याचा प्रकार, तसेच शनिवारवाडा परिसरातील कबरीवर जाऊन आरती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय मंचर परिसरातील मशिदीवर देवाचा फोटो लावण्याचा प्रयत्न झाल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे पुणे शहरातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
संगीता तिवारी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, या प्रकारच्या कृती आणि वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास भारतीय दंड संहितेतील कलम 153A (धर्म किंवा समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करणे), कलम 295A (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम 505(2) (समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारी विधाने) अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच परिस्थिती गंभीर असल्यास प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दंड प्रक्रिया संहितेतील कलम 107 किंवा 151 अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे हे प्रगत आणि शांतताप्रिय शहर असून येथे कोणत्याही प्रकारच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव निर्माण होणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कायद्यानुसार गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.
Complaint Filed with Police Commissioner Seeking Probe into MP Medha Kulkarni’s Statements
महत्वाच्या बातम्या