सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात ठोकला 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा

विशेष प्रतिनिधी

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदे गट कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात 65 कोटी 3 हजार रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रक्रियेसाठी तटकरे यांनी सुमारे ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्क भरले आहे. Sunil Tatkare

आमदार थोरवे यांनी केलेल्या गंभीर आणि निराधार आरोपांमुळे आपली राजकीय तसेच सामाजिक प्रतिमा मलिन झाल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे.

खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंगेश काळोखे यांची हत्या झाली होती. २७ डिसेंबर २०२५ रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. रायगड जिल्ह्यात ‘रक्तरंजित राजकारण’ सुरू असून तटकरे हे जिल्ह्याचे ‘आका’ असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप थोरवेंनी केला होता. काळोखे यांच्या हत्येमागे तटकरे यांचाच हात असून ही घटना पूर्वनियोजित होती, असाही आरोप त्यांनी केला होता.



आमदार महेंद्र थोरवेंनी केलेल्या आरोपांनंतर खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्याविरोधात माणगाव येथील दिवाणी न्यायालयात मानहाणी खटला दाखल केला आहे. या प्रक्रियेसाठी तटकरे यांनी सुमारे ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्क भरले आहे. आरोपांमुळे आपली तीन दशकांची राजकीय कारकीर्द आणि सार्वजनिक जीवनातील स्वच्छ प्रतिमा डागाळली गेल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. “थोरवे यांनी केलेले आरोप केवळ खोटेच नाहीत, तर ते राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत. या विधानांमुळे समाजात माझ्याबद्दल चुकीचा आणि दहशत निर्माण करणारा संदेश जात आहे,” असे तटकरे यांनी नमूद केले.

आमदार थोरवे यांनी केलेले आरोप मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे. बदनामी करणारे सर्व व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्यात यावेत. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही निराधार विधाने करण्यास थोरवे यांना मनाई करावी. झालेल्या मानसिक आणि सामाजिक हानीबद्दल ६५ कोटी ३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

Sunil Tatkare Files 65.03 Crore Defamation Suit Against MLA Mahendra Thorve

महत्वाच्या बातम्या