बीडमध्ये धक्कादायक प्रकार, विवाहित अल्पवयीन तरुणीला घरातून जबरदस्तीने उचलून नेत अत्याचार, चावडीवर बांधून ठेवले

विशेष प्रतिनिधी

बीड : एका विवाहित अल्पवयीन तरुणीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने गावातील चावडीत नेत खांबाला बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या विवाहितेला बांधून ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याला
अटक केली आहे.

10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास वैभव पटेकर घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत अत्याचार केला.

घटनेनंतर पटेकर याने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवलं आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडवून घरी नेलं.



आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र शेवटी तिने हिम्मत करून आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीत तिने वैभव पटेकर या व्यक्तीवर गंभीर आरोप केले असून त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई केली. पीडितेने अधिकृत तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पिंपळनेर पोलिस व पिंक पथकाकडून सुरू आहे.

गरम होत असल्याने रात्रीच्या वेळी महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी हा पीडित महिलेच्या घरात शिरला. घरात सर्वजण झोपले होते. आरोपीने घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत गावाबाहेर नेले. आरोपीने हे कृत्य करत असताना पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिचं तोंड हाताने घट्ट दाबलं. यानंतर आरोपी गावाबाहेरच्या नदीपात्रात पीडितेला घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यावेळी ही तरुणी बेशुद्ध झाली. ही विवाहित तरुणी 17 वर्षांची आहे. तिचा बालविवाह झाला होता. अत्याचार केल्यानंतर आरोपी वैभव पटेकर याने तिला गावच्या चावडीसमोर आणून बांधून ठेवले. सकाळी शुद्धीत आल्यानंतर या तरुणीने मदतीसाठी याचना केली. मात्र, गावकऱ्यांनी तिला मदत केली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी तिला तिथून सोडवून घरी नेले.

Shocking Incident in Beed: Minor Married Woman Abducted from Home, Raped, and Tied to Village Pillar

महत्वाच्या बातम्या