CM Announces : पुण्यात उभारणार 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

पुणे : CM Announces पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे 2.50 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणार्‍या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली.CM Announces

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणार्‍या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणार्‍या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.”CM Announces



सध्या पुणे शहरात सुमारे 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या 23 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित 11 किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे 56 किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी 55 किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे 80 किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. या सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

CM Announces 200-km Metro Network for Pune

महत्वाच्या बातम्या